Saturday, June 6, 2015

पाऊस पडेल का ?

मी नंदीबैलाला विचारलं, 
पाऊस पडेल का ?
तर तो म्हणाला,
गुबूगुबू गुबूगुबू...

मग कोरड्याठाक तळ्याकाठी
उड्या मारणाऱ्या बेडकाला मी विचारलं, 
पाऊस पडेल का ?
तर तो म्हणाला, 
डराव डराव डराव डराव....

तिथूनच वाट काढत काढत 
पोहोचलो मग पडीक रानात
नुकतेच बाहेर पडलेल्या
तिथल्या मिरगाच्या किड्यांना विचारलं,
पाऊस पडेल का ?
तर ते नुसतेच वळवळत
दिसेनासे झाले...

दमून भागून निष्पर्ण झाडाखाली बसलो
तेव्हा कानावर पडला चातकाचा आवाज
आतुरतेने मी त्याला विचारलं
पाऊस पडेल का ? 
तर काहीच न बोलता 
तो देत राहिला आर्त साद...

आभाळाकडे डोळे लावून बसलो तसाच
इतक्यात दिसला नाचणारा मोर
त्याचा फुललेला पिसारा पाहून 
मी पुन्हा तोच प्रश्न त्याला केला
पाऊस पडेल का ? 
तर तो नाचतच राहिला आपल्याच नादात
थुई थुई थुई थुई

पावसाचा सांगावा देणारे हे सारेच जण
पण, कुणाकडेच कसं नाही उत्तर
पाऊस पडेल का ?
या प्रश्नाचं...

आता मी हतबल होऊन
अंदाज बांधू पाहतो वेधशाळेसारखा...
आणि करत बसतो स्टेटस अपडेट
माझ्या थोबाडपुस्तिकेवर
फीलींग पावसाळा वगैरे वगैरे....!!!! 

- दुर्गेश सोनार 

No comments:

Post a Comment