Thursday, July 5, 2012

… सुरू झाली शाळा !


"आई-बाबा, आता माझी सुरू झाली शाळा 
पटापटा आवरा, शाळेत सोडायाला चला... !

नवा नवा फ्रॉक आणि नवे नवे शूज
नव्या नव्या डब्यामध्ये खाऊ आहे खूप !

नवी नवी स्कूलबॅग, सारे नवे नवे
खेळायाला शाळेमध्ये दोस्त नवे नवे !

इतके दिवस घरामध्ये बागडले खूप
आता नवा नवा माझा आहे प्ले ग्रुप !

फार नाही दोनच तास जाईन हं तिथे
मज्जा मज्जा करते आणि लग्गेच घरी येते !”

  • दुर्गेश सोनार ( ५ जुलै २०१२ )

Friday, June 29, 2012

गरजे आभाळ पंढरी



गरजे आभाळ पंढरी
मेघ विठ्ठल सावळा
निघे सरींची पालखी
रंगे आषाढ सोहळा...

पानोपानी झाडांवर
चाले थेंबांचे कीर्तन
निळ्याभोर वाळवंटी
सुरू विजेचे नर्तन...

अंकुरती मातीतून
कोंभ जणू शिरिहरी
डुले हिरवी पताका
शेत होई वारकरी...

सरीतून आला देव
धरा पुंडलिक झाली
आता युगे अठ्ठावीस
बहराची मांदियाळी...

- दुर्गेश सोनार ( २९ जून २०१२ )

Monday, June 11, 2012

प्रस्थान



निघाले तुकोबा
निघाली माऊली
भक्तांची साऊली
विठूराय

देहू आळंदीत
वैष्णवांचा मेळा
आषाढ सोहळा
विठूराय



पाऊले चालती
मुखे हरिनाम
सुखे चारीधाम 
विठूराय

भरो आले मेघ
पावसाची दिंडी
चराचर धुंडी
विठूराय

भेटू दे गा आता
विठोबा सावळा
मनी कळवळा
दाटलासे

- दुर्गेश सोनार ( ११ जून २०१२ )  

Wednesday, June 6, 2012

छत्रीबाई छत्रीबाई


छत्रीबाई छत्रीबाई
इतकी कसली तुला घाई ?
माळ्यावरून उतरलीस
धूळ अशी झटकलीस
पाऊस आता येणार म्हणून
नटून थटून बसलीस...!

- दुर्गेश सोनार ( ५ जून २०१२ )

Monday, May 28, 2012

फेसबुकाच्या वॉलवर


फेसबुकाच्या वॉलवर
दुष्काळाचा छानसा फोटो अपलोड करून
तो वाट बघत बसला
कमेन्टच्या पावसाची...!
थोडंसं पेज रिफ्रेश केलं आणि बघतो तो काय
लाईक्स आणि कमेन्टचा
अक्षरशः धो धो पाऊस...

खरंच,
किती सोशल होत चाललोय आपण
या नेटवर्किंगच्या जमान्यात..!

सगळ्याच समस्यांवर आपण
अशी मिळवू पाहतो ऑनलाईन उत्तरं
आणि चॅट करता करता
करून घेतो आपल्याही संवेदनांचं ऍब्रिव्हिएशन !
कम्प्युटरच्या छोट्याशा विन्डोतून
क्रियाप्रतिक्रियांचे उमटत राहतात
ग्रीन, ऑरेंज आणि आयडल आयकॉन्स...
भावना पोहोचवण्यासाठी उमटतात इमोकॉन्स...
कुणाकुणाशी चॅट करत राहतो आपण
आणि
ऑनलाईन सुखदुःखांच्या गोष्टी करत करत
होत जातो ऑफलाईन
आपल्या भवतालच्या जगापासून...!

- दुर्गेश सोनार ( २८ मे २०१२ )  

Monday, May 7, 2012

नळाला पाण्याची धार बघून....


नळाला पाण्याची धार बघून
काय आनंद झालाय मायमाऊल्यांना...
पहिल्या पावसात भिजताना
जो होतो ना आनंद तोच आनंद
आता त्यांच्याही डोळ्यांत...
माळ्यावरून काढावी जुनी छत्री
तशा त्यांनी काढल्यात कळशा, हंडे आणि घागरी...!

इतके दिवस टिपूसही नव्हता नळाला...
आणि डोळ्यांची धार थांबत नव्हती...
नळासमोरची रांग मोठी
काही केल्या हटत नव्हती..

"आता आलंय पाणी तर थो़डं थोडं भरून घेऊ
साचलेली धुणीभांडी भराभर उरकून घेऊ...”
पदर खोचून बायाबापुड्या स्वतःशीच पुटपुटतात
पाण्यासाठी रातंदिन कुठे कुठे वणवणतात

बाया असं राहतात राबत
पोरसोरं खेळत राहतात
हातात घेऊन कागदी नावा
खड्ड्यामध्ये सोडत राहतात..

नळात नाही, ढगात नाही
कुठेच कसं पाणी नाही
पावशाही व्याकूळला
त्याच्या ओठी गाणी नाही...

कोरड्यास खाऊ कसं
कधी देशील दिलासा ?
खोटा झाला पैसा आता
ये रे ये रे पावसा...!

- दुर्गेश सोनार ( ७ मे २०१२ )


Monday, April 30, 2012

सोनहिरा महाराष्ट्र



                                     क्रांतिवीर अन् सुधारकांचा धगधगता महाराष्ट्र
                                     थोर तपस्वी पुरोगाम्यांचा लखलखता महाराष्ट्र

                                      राकट आणि कणखरतेचा बलशाली महाराष्ट्र
                                      हळूवार अन् नजाकतीचा मखमाली महाराष्ट्र

                                       संतांची ती अभंगवाणी गुणगणतो महाराष्ट्र
                                     शाहिरांच्या पोवाड्यांतून सळसळतो महाराष्ट्र

                                      हिमालयाला साद घालतो सह्यगिरी महाराष्ट्र
                                     दरीखोऱ्यातून मुक्तपणाची मुशाफिरी महाराष्ट्र

                                      लाख संकटे झेलून तरला अबाधित महाराष्ट्र
                                      देशरक्षणासाठी झिजला अनामिक महाराष्ट्र

                                    सुखशांतीचा झुळझुळणारा मुग्ध झरा महाराष्ट्र
                                     भरतभूमीच्या भाळावरचा सोनहिरा महाराष्ट्र

                                                             - दुर्गेश सोनार ( ३० एप्रिल २०१२ )

Monday, March 26, 2012

ग्रेस...


उदास होऊन आता
नुसतेच हलते रान
त्या मलूल संध्याकाळी
निष्पर्ण पहुडले प्राण

झाडाच्या बुंध्यापाशी
पानांची हळवी सळसळ
मातीच्या उदरामध्ये
दुःखाने भिजले मूळ...

व्याकूळ निळाई गाते
अस्वस्थ ढगांच्या ओळी
तो फकीर निघून गेला
राहिली रिकामी झोळी...  


- दुर्गेश सोनार ( २६ मार्च २०१२ )