Monday, October 31, 2011

काही असे... काही तसे...


.
त्यांनी उठाव करताच
काही जण "दक्ष' झाले
शिस्तबद्ध पद्धतीने
"हात'चा राखून लक्ष्य केले !

.
इंद्रप्रस्थासाठी इकडे
लाल कृष्ण फिरतो आहे
खाण तशी माती पाहून
"राम' भरोसे झुरतो आहे !

.
नुसती बूम बूम करण्यापेक्षा
गड्या मौन पाळणेच बरे
"चार'चौघांत नकोच टीमटीम
शांत बसणेच खरे !

- दुर्गेश सोनार ( ३१ ऑक्टोबर २०११ )

Friday, October 14, 2011

दादांच्या हाती कंदिल !


"हाती कंदिल घेऊन
कुठे निघाला हो दादा ?”
"नाही वीज,” दादा म्हणे
"कसा पूर्ण करू वादा ?”

"नाही पुरेसा कोळसा
आणि उकाडाही फार
नाकी नऊ आले "बाबा'
किती सोसावा मी भार !”

"सारे उजेडाचे धनी
नाही अंधारात साथ
आले गोत्यात बघता
त्यांनी वर केले हात !”

किती कुणाची पॉवर
फ्यूज कुणाचे उडले
लोडशेडिंग भोवती
राजकारण रंगले...!

- दुर्गेश सोनार ( दिनांक १४ ऑक्टोबर २०११ )

Wednesday, October 12, 2011

भारनियमनाचा भार पेलत...

सध्या संपूर्ण राज्याला भारनियमनाचे चटके बसत आहेत. तेलंगणसाठीचे आंदोलन आणि उत्तर भारतात आलेला पूर यामुळे कोळशाची ठप्प झालेली आवक, ऑक्टोबर हीटमुळे वाढलेली विजेची मागणी.... अशा कारणांमुळे म्हणे वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. स्वाभाविकच त्याची परिणिती भारनियमनात झाली आहे. या पार्श्वभूमीवर माझी लोडशेडिंग ही कविता इथे देत आहे. ही कविता ठाण्यात झालेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लक्षवेधी ठरली होती. नुकत्याच पुण्याजवळ भोसरी इथे झालेल्या गदिमा कविता महोत्सवातही ही कविता मी सादर केली होती. त्या कार्यक्रमातील कविता सादरीकरणाचा व्हिडिओ इथे दिलेल्या लिंकमध्ये आहे. http://www.youtube.com/watch?v=9UCmTKHIMAA 



Thursday, September 15, 2011

महागाईचा वांधा


कुठे कांद्याचा वांधा
कुठे पेट्रोलचा भडका
सडलेल्या डाळीवर
जळलेला तडका....

- दुर्गेश सोनार ( दिनांक १५ सप्टेंबर २०११)

Thursday, September 1, 2011

'बाप्पां'साठी पाढा


एक दोन तीन चार
बाप्पा, दूर कर भ्रष्टाचार

पाच सहा सात आठ
बाप्पा, संकटांची लाव वाट

नऊ, दहा, अकरा, बारा
बाप्पा, बरसू दे सुखधारा

तेरा, चौदा, पंधरा, सोळा
बाप्पा, महागाईला मार टोला

सतरा, अठरा, एकोणीस, वीस
बाप्पा, राहो सारे ऐसपैस... !

- दुर्गेश सोनार ( दिनांक १ सप्टेंबर २०११ )

Monday, August 29, 2011

आंदोलनाच्या मांडवझळा


भगव्या कफनीतले स्वामी म्हणाले,
'ते कसे पिसाळलेल्या हत्तीसारखे झालेयत...!'
त्यावर त्यांनाही कसं अगदी 'हाथी चले अपने चाल' असं वाटलं...
आपल्याच धुंदीत त्यांनी मग आपापलं घर गाठलं...!
तर तिकडे रामलीलेवरचा 'ओम'काराचा नाद
थेट संसदेत गुंजला
निरक्षर आणि गावंढळपणाचा डाग
खादीवाल्यांना झोंबला...!

लोकशाहीच्या दरबारात आता
अशा आंदोलनाच्या मांडवझळा
कुठे आनंदाच्या उकळ्या
तर कुठे पोटदुखीच्या कळा...

- दुर्गेश सोनार ( २९ ऑगस्ट २०११ )

Saturday, August 27, 2011

जनलोकपाल


संसदेच्या आखाड्यात
जनशक्तीची सरशी झाली
अण्णांच्या अटींसमोर
भल्याभल्यांची गोची झाली !

- दुर्गेश सोनार ( २७ ऑगस्ट २०११ )

Thursday, August 25, 2011

एक हट्ट पुरवा महाराज....


( ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपालसाठी पुकारलेल्या आंदोलनाकडे पाहताना का कुणास ठाऊक पण मनात राहून राहून गदिमांच्या 'एक हौस पुरवा महाराज' या लावणीच्या ओळी रुंजी घालत होत्या. अखेर लोकपालबाबतच्या आंदोलनाची ही लावणी आपसूकच आली. गदिमांची क्षमा मागून आजच्या तत्कालिकेत ही लोकपालची लावणी... )

एक हट्ट पुरवा महाराज
करा संमत लोकपाल आज

अहो काहीतरी करून
लोकांकडे बघून
दिल्लीमधे जाऊन
संसदेत बसून
गेंड्यांना धडा तुम्ही शिकवा
चला उठा दाजिबा
दिल्लीला तुम्ही आज...

जरा जरा बघा तरी आमचा लुटला मळा
व्याकुळला कंठ धारदार सुरी कापते गळा
उरी आले दडपण कुटिल घाट आगळा
मनासारिखे इतुके घडवा
लोकपाल संसदेत मढवा
त्याचा डंका चहूकडे बडवा
एवढी अर्जी ऐकावी आज

डोक्यावरी गांधीटोपी साजे लोभस गोमटी
मंचावर पुढ्यात झेंडे घेऊन बसा तुम्ही पाठी
रामलीला सुरू जन हिंडती हक्कांसाठी
सारी खदखद जोमानं निघू द्या
जरा सुखानं भाकर खाऊ द्या
लोकपालात बुडतील बुडू द्या
कुणी म्हणेल म्हणो हट्टीबाज

- दुर्गेश सोनार ( दि. २५ ऑगस्ट २०११ )

Wednesday, August 24, 2011

लोकपालची गझलियत


लोकपालचे अवघड कोडे
नुसत्या चर्चा मुद्दा सोडे !

चर्चेमधले कानी येते
त्यांचे थोडे ह्यांचे थोडे...!

टीव्हीवरती लाईव्ह गप्पा
कुणी अकलेचे तारे तोडे !

कुठे खातसे पेंड कळेना
अडून बसले कोठे घोडे ?

घरंदाजीचा प्रभाव इतुका
नेते घडती पुसून जोडे !

खिन्न महात्मा सुन्न मायभू
डोळ्यांदेखत कंबर मोडे !

- दुर्गेश सोनार ( २४ ऑगस्ट २०११ )

Friday, August 19, 2011

लोकपालाचा पाळणा


राजघाटावर अण्णांचा धावा
दुसऱ्या क्रांतीचा केला रे दावा
गांधीटोपीचा एल्गार नवा
लोकपाला जो जो रे जो....

संसदेकडे दान मागितले
त्यासाठी किती आर्जव केले
विधेयकाचे सोंग ते झाले
लोकपाला जो जो रे जो...

अण्णांच्या मागे भूषण मोठे
आशेचा नवा किरण भेटे
कुणाकुणाची दुखली पोटे
लोकपाला जो जो रे जो...

चिदम्बतरूची केवढी शोभा
मध्ये बापुडा कपिल उभा
पवन गर्जतो भेदत नभा
लोकपाला जो जो रे जो...

खाकी खादीला आव्हान दिले
ताठ होते ते वाकून गेले
कारागृहाचे कवतिक झाले
लोकपाला जो जो रे जो...

जिथे तिथे आता क्रांतीचे गान
आम आदमी उंचावी मान
निर्जिव शिळेत फुंकला प्राण
लोकपाला जो जो रे जो...

दिव्याचे तेज मेणबत्तीला
पात्याची धार साध्या काठीला
अगाध अशीही रामाची लीला
लोकपाला जो जो रे जो...

- दुर्गेश सोनार ( १९ ऑगस्ट २०११ )




Thursday, August 18, 2011

च्यानेलवरची अण्णागिरी


आबा आले, बाबा आले
त्यात्या आले, मामा आले
अबूबाई, ढबूताई
गावभरचे लोक आले....!

मेणबत्त्या घेऊन आले
टोप्या, झेंडे घेऊन आले
पाठोपाठ त्यांच्या आता
च्यानेलवाले बूम आले...!

गल्लीपासून दिल्लीपर्यंत
देशभक्तीचे पीक आले
जिकडे तिकडे नारेबाजी
उत्साहाला उधाण आले...!

ऑनलाईन ऑफलाईन
नेटवर्किंग सुरु झाले
चड्डीवाल्या पोरांपासून
मोठेसुद्धा अण्णा झाले...!

टीव्हीवरती सगळे सगळे
आंदोलन "लाईव्ह' झाले
टीआरपीच्या गणितात
च्यानेल "सर्वाईव्ह' झाले !

- दुर्गेश सोनार ( १८ ऑगस्ट २०११)  

Saturday, August 13, 2011

एल्गार


क्रांतीचा एल्गार पेटू दे पुन्हा एकदा
म्यानातून तलवार उसळू दे पुन्हा एकदा

परके गेले, घरभेद्यांना रान मोकळे
`चले जाव`चा नाद घुमू दे पुन्हा एकदा

स्वैराचारी काळरात्र ती किरकिरणारी
स्वच्छ तांबडे नवे फुटू दे पुन्हा एकदा

राज्य असे लोकांचे हे लोकांच्यासाठी
लोकशाहीचा विजय होऊ दे पुन्हा एकदा

- दुर्गेश सोनार ( १३ ऑगस्ट २०११ )

Thursday, August 11, 2011

पवनाकाठी लाठी


बळीराजाची करुण कहाणी
गातो पवनाकाठ
"खाकी'नंतर "खादी'नेही
पुरी लावली वाट !

'रक्षक झाले भक्षक' म्हणुनी
कुणी करी गर्जना
'लोकशाहीचा एन्काऊंटर हा..!'
कुणी करी वल्गना

पाण्यासाठी केले त्यांनी
रक्ताचेही पाणी
मावळच्या खोऱ्यात रंगली
राजकारणी गाणी !

पाठीवरती लाठ्या आणि
छातीवरती गोळी
किती लढावे तरी राहते
रिकामीच ही झोळी...!

- दुर्गेश सोनार ( ११ ऑगस्ट २०११ )

Wednesday, August 10, 2011

पवनाकाठचे धोंडे


पवनाकाठचे धोंडे
कुणाकुणाला बसले
धरणामधलं पाणी
पाईपात फसले !

- दुर्गेश सोनार ( १० ऑगस्ट २०११ )

Tuesday, August 9, 2011

पेटलेले पाणी...


एका एका थेंबासाठी
आता पेटलेले पाणी
उरी घालमेल आणि
ओठी वेदनेची गाणी

इथे तेलाचा तवंग
पितो अथांग सागर
तिथे बळीराजा मुका
त्याची रिकामी घागर

घोटभर पाण्यासाठी
घेती नरडीचा घोट
असा जमाना आजचा
नाही खरा पाणलोट !

- दुर्गेश सोनार ( ९ ऑगस्ट २०११ )

Saturday, August 6, 2011

फ्रेन्डशिप डे


कुणी कुणाचेही कधी
उगा जास्त करू नये
गळा केसाने कापतो
त्याला दोस्त म्हणू नये !

- दुर्गेश सोनार ( ६ ऑगस्ट २०११ )

Friday, August 5, 2011

खड्ड्यात गेले....!


भर पावसात म्हणे
रस्ता वाहुनिया गेला
खड्डे चुकवित गड्या
पदपथावर चाला...

पदपथावर तरी
कसे चालावे बापुडे ?
इथे रस्त्यावर खड्डे
तिथे खुशाल झोपडे..!

घेऊ आधार म्हटले
जरी उड्डाणपुलाचा
तिथेसुद्धा स्वागताला
टोल लागला खड्ड्याचा !

खड्डे पाहुनिया नेते
सभागृहात बोलले
दिवास्वप्न पालिकेचे
त्यांनी खड्ड्यात पाहिले..!

गावाकडे काटेकुटे
शहरात खड्डे मोठे
मायबाप जनतेने
सुखासुखी जावे कोठे ?

- दुर्गेश सोनार ( ५ ऑगस्ट २०११ )

Thursday, August 4, 2011

सारे मोकाट सुटले...


सारे मोकाट सुटले
त्यांना रोखणार कोण ?
सारा अंधार भोवती
दिवा लावणार कोण ?

मायबाप खुर्चीसाठी
सारा नात्यांचा लिलाव
खुर्ची स्वतःची राखून
जो तो करतो उठाव !

जागोजागी, जिथे-तिथे
निदर्शने, आंदोलन
सत्तेसाठी वाटाघाटी
सुरू लांगूलचालन !

सारे मुखवटे असे
नाही चेहरा तो खरा
जुल्मी डोळ्यांतून तरी
कसा पालवेल झरा ?

रक्त गोठले असे की
कसे स्फुरावेत बाहू ?
स्वप्न पुढच्या पिढीला
कसे फुलण्याचे दावू ?

- दुर्गेश सोनार ( दिनांक ४ ऑगस्ट २०११ )

Wednesday, August 3, 2011

चर्चेचे गुऱ्हाळ


सुरू चर्चेचे गुऱ्हाळ
थक्क लोकसभा झाली
नेते बोलले बोलले
किती महागाई झाली..!

कसा बघता बघता
दाम दुप्पट वाढला
आम आदमीचा खिसा
किती सहज कापला..!

- दुर्गेश सोनार ( ३ ऑगस्ट २०११ )

Tuesday, August 2, 2011

खादाडांची अंगतपंगत


खाणाऱ्यांची भूक अशी की
जे जे दिसले खातच गेले...
खादाडांची पंगत बसली
मिळेल ते ते गट्टम केले...

कुणी लाटली जमीन कुणाची
कुणी लाटला चारा
दूर दूर संचार करुनी
कुणी लाटल्या तारा

कलकल नुसती माडीवरती
खेळात अडकले भाई
राष्ट्रकुलातून पदक कमाई
काही उरली नाही..!

ताकावरचे लोणी घुसळून
राजा खाई तुपाशी
साधीभोळी प्रजा बिचारी
राही तशीच उपाशी !

- दुर्गेश सोनार ( २ ऑगस्ट २०११ )

Monday, August 1, 2011

घोटाळ्यांचा स्केलेटन


कशाला ठेवता
झाकून घरात
कपाटाच्या आत
स्केलेटन !


त्यांनी विचारला
नेमका सवाल
त्यावर बवाल
विरोधाचे...!


आपलेच दात
आपलेच ओठ
मर्मावर बोट
ठेवलेले !


सुरू पावसाळी
दिल्लीत गोंधळ
सारेच भोंगळ
एकजात !

- दुर्गेश सोनार 

फेरबदलाचा अभंग


म्हणे गुरूदास,
"
नको मंत्रिपद,पक्षसंघटना
पाहू दे गा....!"
राजीनामा देत
मुहूर्त साधला
कशाला सोहळा
शपथेचा..?
करूयात आता
जिवाची मुंबई
"
कृपे'ची आवई
नको आता...!
इकडे विलास
तिकडे विरप्पा
नाराजीच्या गप्पा
टीव्हीवर....!

-
दुर्गेश सोनार

राग कर्नाटकी...


येडी येडी म्हणे
गावची बाभूळ
खाणीत कमळ
येडावले....

- दुर्गेश सोनार  

"तत्कालिके'ची भूमिका

तत्कालिका... हे एक निमित्त आहे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर भाष्य करण्याचं... आपल्या अवतीभवती अनेक घटना घडत असतात आणि त्यावर आपण अनेकप्रकारे व्यक्तही होत असतो. कधी तिरकसपणे तर कधी अगदी थेट आपण आपली प्रतिक्रिया देत असतो. ही त्या त्या वेळी येणारी तत्काळ प्रतिक्रिया असते. अशा तत्काळ उमटणाऱ्या प्रतिक्रियांचं प्रतिबिंब म्हणजेच ही तत्कालिका.... मराठी कवितेच्या प्रांतात वात्रटिका, मस्करिका, मिश्किली... अशा अनेक नावांनी अशा भाष्य करणाऱ्या उपहासात्मक कविता अनेकांनी लिहिलेल्या आहेत. कवितेच्या याच वाटेवरचा माझा हा नवा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडेल, असं वाटतं...
- दुर्गेश सोनार. ( दिनांक १ ऑगस्ट २०११ )