Friday, June 29, 2012

गरजे आभाळ पंढरी



गरजे आभाळ पंढरी
मेघ विठ्ठल सावळा
निघे सरींची पालखी
रंगे आषाढ सोहळा...

पानोपानी झाडांवर
चाले थेंबांचे कीर्तन
निळ्याभोर वाळवंटी
सुरू विजेचे नर्तन...

अंकुरती मातीतून
कोंभ जणू शिरिहरी
डुले हिरवी पताका
शेत होई वारकरी...

सरीतून आला देव
धरा पुंडलिक झाली
आता युगे अठ्ठावीस
बहराची मांदियाळी...

- दुर्गेश सोनार ( २९ जून २०१२ )

Monday, June 11, 2012

प्रस्थान



निघाले तुकोबा
निघाली माऊली
भक्तांची साऊली
विठूराय

देहू आळंदीत
वैष्णवांचा मेळा
आषाढ सोहळा
विठूराय



पाऊले चालती
मुखे हरिनाम
सुखे चारीधाम 
विठूराय

भरो आले मेघ
पावसाची दिंडी
चराचर धुंडी
विठूराय

भेटू दे गा आता
विठोबा सावळा
मनी कळवळा
दाटलासे

- दुर्गेश सोनार ( ११ जून २०१२ )  

Wednesday, June 6, 2012

छत्रीबाई छत्रीबाई


छत्रीबाई छत्रीबाई
इतकी कसली तुला घाई ?
माळ्यावरून उतरलीस
धूळ अशी झटकलीस
पाऊस आता येणार म्हणून
नटून थटून बसलीस...!

- दुर्गेश सोनार ( ५ जून २०१२ )