Monday, October 31, 2011

काही असे... काही तसे...


.
त्यांनी उठाव करताच
काही जण "दक्ष' झाले
शिस्तबद्ध पद्धतीने
"हात'चा राखून लक्ष्य केले !

.
इंद्रप्रस्थासाठी इकडे
लाल कृष्ण फिरतो आहे
खाण तशी माती पाहून
"राम' भरोसे झुरतो आहे !

.
नुसती बूम बूम करण्यापेक्षा
गड्या मौन पाळणेच बरे
"चार'चौघांत नकोच टीमटीम
शांत बसणेच खरे !

- दुर्गेश सोनार ( ३१ ऑक्टोबर २०११ )

Friday, October 14, 2011

दादांच्या हाती कंदिल !


"हाती कंदिल घेऊन
कुठे निघाला हो दादा ?”
"नाही वीज,” दादा म्हणे
"कसा पूर्ण करू वादा ?”

"नाही पुरेसा कोळसा
आणि उकाडाही फार
नाकी नऊ आले "बाबा'
किती सोसावा मी भार !”

"सारे उजेडाचे धनी
नाही अंधारात साथ
आले गोत्यात बघता
त्यांनी वर केले हात !”

किती कुणाची पॉवर
फ्यूज कुणाचे उडले
लोडशेडिंग भोवती
राजकारण रंगले...!

- दुर्गेश सोनार ( दिनांक १४ ऑक्टोबर २०११ )

Wednesday, October 12, 2011

भारनियमनाचा भार पेलत...

सध्या संपूर्ण राज्याला भारनियमनाचे चटके बसत आहेत. तेलंगणसाठीचे आंदोलन आणि उत्तर भारतात आलेला पूर यामुळे कोळशाची ठप्प झालेली आवक, ऑक्टोबर हीटमुळे वाढलेली विजेची मागणी.... अशा कारणांमुळे म्हणे वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. स्वाभाविकच त्याची परिणिती भारनियमनात झाली आहे. या पार्श्वभूमीवर माझी लोडशेडिंग ही कविता इथे देत आहे. ही कविता ठाण्यात झालेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लक्षवेधी ठरली होती. नुकत्याच पुण्याजवळ भोसरी इथे झालेल्या गदिमा कविता महोत्सवातही ही कविता मी सादर केली होती. त्या कार्यक्रमातील कविता सादरीकरणाचा व्हिडिओ इथे दिलेल्या लिंकमध्ये आहे. http://www.youtube.com/watch?v=9UCmTKHIMAA