Friday, August 5, 2011

खड्ड्यात गेले....!


भर पावसात म्हणे
रस्ता वाहुनिया गेला
खड्डे चुकवित गड्या
पदपथावर चाला...

पदपथावर तरी
कसे चालावे बापुडे ?
इथे रस्त्यावर खड्डे
तिथे खुशाल झोपडे..!

घेऊ आधार म्हटले
जरी उड्डाणपुलाचा
तिथेसुद्धा स्वागताला
टोल लागला खड्ड्याचा !

खड्डे पाहुनिया नेते
सभागृहात बोलले
दिवास्वप्न पालिकेचे
त्यांनी खड्ड्यात पाहिले..!

गावाकडे काटेकुटे
शहरात खड्डे मोठे
मायबाप जनतेने
सुखासुखी जावे कोठे ?

- दुर्गेश सोनार ( ५ ऑगस्ट २०११ )

No comments:

Post a Comment